जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ६००० कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार

रत्नागिरी : ग्राहकांच्या दृढ विश्वास आणि उत्कृष्ठ व विनम्र सेवांच्या जोरावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्धवार्षिक अहवालानुसार ३० सप्टेंबर २०२६ अखेर ₹ ६००० कोटी रुपयांचा एकूण व्यवसायाचा टप्पा यशस्वीपणे पार करुन नफा ₹४९ कोटी १३ लाख ३६ हजार इतका झाला आहे. गतवर्षीचे सप्टेंबरपेक्षा ₹१०कोटी ७४ लाखाने घसघशीत वाढ झालेली आहे. अशाप्रकारे आपल्या यशाची कमान उंचावून यशस्वीपणे घोडदौड सुरु ठेवलेली आहे.
राज्यातील अग्रगण्य जिल्हा बँक म्हणून नावलौकिक असलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहक सेवा व आधुनिकतेची वाट धरुन डिजिटलायझेशनला विशेष महत्व दिलेले असून बँकेमार्फत NEFT/RTGS, ATM, Mobile Banking, QR Code या सारख्या सुविधा ग्राहकांना देत असताना जिल्ह्यातील ग्राहकांकरीता बँक काही दिवसात AEPS सुविधा कार्यान्वीत करत आहे. अशा प्रकारे AEPS सुविधा ग्राहकांना देणाऱ्या राज्यातील ३ जिल्हा बँकांपैकी रत्नागिरी बँक एक बँक असून लवकरच ग्राहकांच्या सेवेत या सुविधेची वाढ होणार आहे.
गतवर्षीपेक्षा बँकेने ठेवी, कर्ज व नफ्यात लक्षणिय वाढ केल्यामुळे बँकेचे सन्माननिय अध्यक्ष आदरणीय कृषिभुषण डॉ.तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री. बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालक महोदय यांनी बँकेचे सभासद, ग्राहक यांना त्यांच्या सहकार्यामुळे झालेल्या व्यवसाय वृद्धीबाबत आभार व्यक्त करुन असाच दृढ विश्वास बँकेवर कायम ठेवण्याबाबत आवाहन केले आहे.
संचालक मंडळाने घेतलेले अचूक निर्णय व बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांनी केलेल्या प्रयत्न यामुळे बँकेला हे यश प्राप्त झाले आहे असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर गिम्हवणेकर यांनी मत व्यक्त केले. बँकेच्या यशाबाबत सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.



