कोकणदेश-विदेशपर्यटनमहाराष्ट्ररेल्वे

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी

  • खासदार नारायण राणे यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र

रत्नागिरी : कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी ठोस मागणी रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सविस्तर पत्र पाठवून स्थानिक नागरिकांच्या अडचणी मांडल्या आहेत.

सन १९९८ पासून सुरू असलेली ही पॅसेंजर सेवा कोविड काळात बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आजतागायत ही गाडी दादर येथून पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या काही गाड्या दिवा स्थानकातून रत्नागिरीकडे सोडल्या जात असल्या तरी पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी हा पर्याय अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे.

पूर्वीप्रमाणेच दादर येथून ही गाडी सुरू व्हावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. परंतु दादर–रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद करण्यात आल्याचे समोर येत असून, त्याऐवजी दादर–गोरखपूर आणि दादर–बलिया या लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

ही पॅसेंजर ट्रेन विशेषतः गरीब, कामगार, विद्यार्थी, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांसाठी स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचे प्रमुख साधन होते. सध्याच्या एक्सप्रेस गाड्यांचे वाढलेले भाडे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचा रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने मुंबईशी सतत संपर्क असतो. त्यामुळे ही सेवा त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सध्या काही पर्यायी गाड्या उपलब्ध असल्या तरी त्या सर्वांसाठी सोयीस्कर नाहीत. विशेषतः विद्यार्थी व रुग्णांना प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच मासेमारी, आंबा आणि काजू व्यापारासारख्या स्थानिक व्यवसायांवरही या सेवेच्या बंदमुळे प्रतिकूल परिणाम झाला आहे.

या पार्श्वभूमीवर दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन तात्काळ पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असून, कोकणातील जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button