दापोली समर सायक्लोथॉन २०२४ मध्ये तब्बल २०० स्पर्धकांचा सहभाग
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२४, सिझन ५ सायकल स्पर्धा रविवार २८ एप्रिल २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील, देशातील वय ८ ते ७१ वयोगटातील २०० स्पर्धक आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभागी झाले होते.
दापोली आसूद हर्णै मुर्डी आंजर्ले आडे उटंबर दापोली या समुद्रकिनाऱ्यावरील ६० किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, आंजर्ला कासव महोत्सव अनुभवला, आंबे फणस, मासे खाल्ले.
ही सायक्लोथॉन स्पर्धा ३० व ६० किमी कोस्टल सिनिक रुट, शॉर्ट सिटी लूप, फॅन राईड अशा अनेक गटात झाली. ६० किमी अंतर अनेकांनी ३ तासाच्या आत पूर्ण केले. सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये ७१ वर्षीय प्रवीणकुमार कुलथे ठाणे, ६०+ वयोगटातील सतीश जाधव परेल, डॉ चिमा चेंबूर, सुनील गाडगीळ जोगेश्वरी, अनंत सहस्त्रबुद्धे छत्रपती संभाजीनगर, धनंजय तेलगोटे ठाणे, विनायक वैद्य खेड, सीताराम रोकडे, बाला रोकडे सिवूड, सुवर्णा अडसुळे ठाणे, महेश दाभोलकर ऐरोली इत्यादींना खास सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच ६० किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार १४ वर्षीय वरद कदम, स्वराज मांजरे, साईप्रसाद वराडकर, आयुष जोशी, वेदांग करंदीकर हे ठरले. ३० किमी पूर्ण करणारे लहान सायकलस्वार १३ वर्षीय अवधूत पाते, रुद्र बडबे हे ठरले. शॉर्ट सिटी लूप गटात ८ वर्षीय आदिनाथ शिगवण आणि अनन्या गोलांबडे हे लहान सायकलस्वार ठरले. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी एका दिवसात २३० किमी अंतर सायकल चालवत कल्याण ठाणेहुन आलेले राज वाघ, चिन्मय फोंडबा, पंकज फाले यांनाही गौरवण्यात आले. तसेच सिंगापूर ते लंडन सायकल प्रवास करत दापोलीत पोहोचलेले टॉम व जुलिया यांनीही स्पर्धकांसोबत सायकल चालवत त्यांचे अनुभव कथन केले.
या सायक्लोथॉनच्या निमित्ताने दापोलीचे सौंदर्य कुटुंबासह पाहता आल्यामुळे बाहेरगावाहून आलेले सर्व रायडर खुश होते. अनेकांनी २ ते ६ दिवस मुक्काम करुन स्थानिक वस्तूंची खरेदी केली. सायक्लोथॉनसाठी प्रमुख अतिथी नगराध्यक्षा ममता मोरे, दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या डॉ जतकर व टीम, दापोली तालुका आरोग्य अधिकारी डॉ मारकड व टीम, दापोली पोलीस टीम, राहुल मंडलिक इत्यादी अनेक मान्यवर स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांतर्फे सायकल स्पर्धकांचे स्वागत, पाहुणचार करण्यात आला. या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, अजय मोरे, राजेशकुमार कदम, रागिणी रिसबूड इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.