मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणादिन

रत्नागिरी : भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती, थोर अणुशास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव, रत्नागिरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. चौधरी यांनी वाचन प्रेरणा दिन, तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याचा व वाचन संस्कृती जोपासण्याचा संकल्प केला. यानंतर सर्व विद्यार्थ्यानी ग्रंथालयात एकत्र बसून एक तास वाचन करून डॉ. कलाम यांना अभिवादन केले.
विविध पुस्तकांमधील प्रेरणादायी कथा, जीवनमूल्ये आणि वैज्ञानिक माहिती यांचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला, ज्यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.



