आरोग्यकोकणमहाराष्ट्रशिक्षण

वालोपे येथे ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात

  • भारुड, पोषण आरती अन् पाककृती प्रदर्शनातून दिला आरोग्याचा संदेश

रत्नागिरी : एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१, बीट दादर-२ अंतर्गत वालोपे येथे ‘सेवा संकल्प अभियान’ विविध नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. आरोग्य, सुदृढ पोषण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणाचा जागर करत या अभियानाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे औचित्य साधून पौष्टिक पाककृती व आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी पारंपरिक लोककला भारुड आणि सुश्राव्य ‘पोषण आरती’ सादर करत आरोग्याचा संदेश मनोरंजक आणि प्रभावी पद्धतीने उपस्थितांपर्यंत पोहोचवला.

या सांस्कृतिक सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
याप्रसंगी आयोजित विशेष सोहळ्यात मुलगी जन्माचे स्वागत करत कन्यारत्न असलेल्या मातांना सन्मानपूर्वक ‘आशीर्वादाचा दिवा’ देण्यात आला. तसेच ‘लेक लाडकी योजना’ आणि ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनांच्या लाभार्थी महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. बालकांच्या आरोग्याची काळजी घेत सर्व चिमुकल्यांना फळवाटप करण्यात आले, तर ग्रामपंचायत वालोपे यांच्यावतीने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या अविरत सेवेचा गौरव करत त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सरपंच अनिशा काजवे, माजी उपसरपंच समिधा कदम, अंगणवाडी पर्यवेक्षिका मनीषा चिपळूणकर, अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यक सावंत सिस्टर, सीएचओ श्रीमती शेख, पोलीस पाटील माधवी जाधव, बचत गटाच्या सीआरपी रसिका आयरे, स्वाती सोलकर, ग्रामपंचायत अधिकारी विश्वास पवार आदी उपस्थित होते.
तसेच आशा स्वयंसेविका सायली जाधव, रेशमा धामणकर, अंगणवाडी सेविका ऋतुजा शिरकर, मनस्वी शिरकर, श्रेया धामणकर, मदतनीस भार्गवी गोरीवले, विद्या करंजकर, सुप्रिया नवेले आणि ग्रामपंचायत कर्मचारी अनंत आग्रे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यवेक्षिका मनीषा चिपळूणकर यांनी प्रास्ताविकातून सेवा संकल्प अभियानामागील हेतू स्पष्ट केला. तर आरोग्य सहाय्यक श्रीमती सावंत सिस्टर यांनी सुदृढ आरोग्यासाठी पोषणाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन माधुरी जाधव यांनी केले. विविध प्रबोधनात्मक उपक्रमांमुळे हा सोहळा वालोपे ग्रामस्थांसाठी विशेष संस्मरणीय ठरला.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button