शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेचे उरण पं. स. समोर उपोषण

- समस्या सोडविण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आश्वासन
- आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित
उरण दि. २ (विठ्ठल ममताबादे ) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त उरण पंचायत समितीसमोर शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. विस्थापित कुटुंबांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ग्रामपंचायतीच्या हद्दीबाहेर असलेल्या काही कुटुंबांना वैयक्तिक नळ कनेक्शनच्या खर्चासाठी ओएनजीसी कंपनीच्या सी एस आर निधीतून निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित ग्रामसेवक, प्रशासकीय ग्रामपंचायत हनुमान कोळीवाडा व गटविकास अधिकारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
हनुमान कोळीवाडा गावातील मुख्य पाणीपुरवठा लाईनवरून बाहेरील कुटुंबांना देण्यात आलेली कनेक्शने तात्काळ बंद करावीत अशी मागणी करण्यात आली आहे . तसेच कथितरीत्या विनापरवानगी दुसऱ्या आळीच्या पाणीपुरवठा लाईनवरून नळ कनेक्शन घेतल्याचा आरोप संघटनेने केला असून, या प्रकरणाची चौकशी करून दोष आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामनिधीत आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार केल्याचा आरोपही संघटनेने केला असून, या प्रकरणाची चौकशी करून शासनाच्या निर्णयानुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.प्रशासनाने वैयक्तिक लक्ष घालून मा. उच्च न्यायालयाचे WP NO.8655 OF 2025 चे दि.२९/०४/२०२६ व ३०/०९/२०२६ रोजीचे आदेशानुसार संक्रमण शिबिराची पाणी पुरवठ्याची १.७ कि. मि. लांबीची व ४ इंच व्यासाची मुख्य पाइप लाइन नवीन टाकावी व नागरी सुविधा द्याव्यात. मा. उच्च न्यायालयाचे आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.अशी मागणी करण्यात आली आहे.संघटनेने विविध मागण्यांवर प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नियमानुसार चौकशी व कार्यवाही करावी, अशी भूमिका घेतली आहे.
“विस्थापित कुटुंबांच्या प्रश्नांवर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही करावी,” अशी मागणी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने केली आहे.
यावेळी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेचे पदाधिकारी कल्याणी परमानंद कोळी, उज्वला रमेश कोळी,आरती जयेश कोळी, जनाबाई मोतीराम कोळी,अलका दत्तराम कोळी, नंदा सुरेश कोळी, जयश्री विश्वनाथ कोळी,सुरेखा दत्ता कोळी,अमृता किर्ती कोळी, अस्मिता अमित कोळी, भारती जगदीश शेवेकर व इतर महिला पदाधिकारी,ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्या उपोषणाची दखल घेत उरण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील,सभापती महेश म्हात्रे,उपसभापती परेश ठाकूर यांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. व कोणावरही अन्याय होणार नाही याची हमी दिली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर व आश्वासना नंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर लवकरच सर्व मागण्या मान्य होऊन त्वरित अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.



