सफाई कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राध्यान्याने द्यावा

- राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर
रत्नागिरी, दि. ८ : सफाई कामगारांना मालकी हक्कांनी निवास देणे, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, सायकल देणे, वेळेवर निवृत्ती वेतन सुरु करणे, समाजगृह देणे यासारख्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्यावा, येत्या 3 महिन्यात याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम 2013 ची अंमलबजावणीबाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरिता केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव गारवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. डागोर यांनी सर्वप्रथम सफाई कामगारांची एकूण पदे, रिक्त पदे, भरलेली पदे, कंत्राटी आणि नियमित पदे याबाबत सविस्तर माहिती घेतली. सफाई कामगारांसाठी 19 ऑगस्ट 1987, 22 ऑक्टोबर 2008, 1975 चा लाड पागे शासन निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सफाई कामगारांच्या वारसांना 30 दिवसात नियुक्ती देण्याचा शासन निर्णय आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. सर्वच विभागाने मानवतावादी दृष्टीकोण ठेवून सफाई कामगारांचे आरोग्य तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. आयटीआय, विश्वनगर येथील निवासस्थाने मालकी हक्काने सफाई कामगारांना द्यावीत.
त्यांच्या आरोग्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करावे. या शिबीरात आयुष्यमान कार्ड सारख्या सुविधा द्याव्यात. त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरुन घ्यावेत. स्वयंरोजगाराच्या योजना राबवा. कोरोनाच्या काळात सफाई कामगार जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करत होते. आजही त्यांनी आपले सफाईची काम बंद केले तर समाजाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या सर्वाचा विचार करुन त्यांना त्यांचे लाभ प्राधान्याने मिळवून द्यावेत.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी सांगितले की, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना नोडल अधिकारी बनवून पूर्ण जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांची यादी बनविली जाईल. त्यासाठी विविध विभागांची बैठक घेतली जाईल. त्यांच्यासाठी शिबीर घेऊन त्यांचे प्रश्न निश्चितपणाने मार्गी लावू.
चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर या पदावर तन्वी काशिनाथ कांबळे हिला श्री. डागोर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.



