दुष्काळात करपलेल्या भातशेतीला शासनाचा दिलासा

लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम मदतीचे ५ हजार रुपये जमा
रत्नागिरी : यंदा पावसाने ऐन गरजेच्या वेळी पाठ फिरवल्याने लांजा तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करत तातडीने केलेल्या पंचनाम्यांमुळे शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात झाली असून, नुकसानग्रस्त बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
लांजा तालुक्यातील सालपे येथील शेतकरी सुरेश विठ्ठल यांनी आपल्या व्यथा मांडताना शासनाच्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांची सालपे गावात सुमारे १ एकर क्षेत्रावर भातशेती आहे. पिकाला ज्या वेळी पाण्याची सर्वाधिक गरज होती, नेमक्या त्याच वेळी पावसाचा खंड पडल्याने संपूर्ण १ एकरातील उभी भातशेती डोळ्यादेखत करपून गेली. वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला होता.
दरम्यान, शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर शासनाकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ५,००० रुपयांची अग्रिम आर्थिक मदत वर्ग करण्यात आली आहे. संकटसमयी तातडीने मदत मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत.
“अस्मानी संकटाच्या काळात शासनाने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ही मदत दिली. पुढील काळातही अशा बिकट परिस्थितीत शासनाने बळीराजाला सावरण्यासाठी असाच आधार द्यावा,” अशी भावना सुरेश विठ्ठल यांनी व्यक्त केली आहे.



