मार्लेश्वर येथे भाविकांना ‘राज्य प्राणी’ शेकरूचे दर्शन!

- पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
देवरुख ( रत्नागिरी): महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या दुर्मिळ शेकरूचे रविवारी मार्लेश्वर पर्यटनस्थळ परिसरात भाविकांना दर्शन झाले. संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर तीर्थक्षेत्रात अचानक शेकरू दिसल्याने भाविक आणि पर्यटकांनी आनंद साजरा केला. हा दुर्मिळ क्षण सर्वांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

शेकरू हा सामान्य खारीपेक्षा तिप्पट मोठा असतो. त्याची लांब आणि दाट शेपटी हीच त्याची मुख्य ओळख आहे. हा अत्यंत लाजाळू प्राणी आहे. हा प्राणी प्रामुख्याने भीमाशंकर अभयारण्य, फणसाड, आंबा घाट, माहुली, वासोटा तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कळसूबाई हरीश्चंद्रगडाच्या जंगलात आढळतो.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये आणि मार्लेश्वर परिसरात शेकरूचा वावर असल्याचे वनपाल सागर गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. मार्लेश्वरच्या घनदाट जंगलात हा दुर्मिळ प्राणी आढळणे हे येथील जैवविविधता समृद्ध असल्याचे लक्षण आहे.



