महाराष्ट्राच्या रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धिंगाणा खपवून घेणार नाही

- परराज्यातील संस्कृती महाराष्ट्रावर लादण्याच्या प्रकाराविरोधात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीचा मध्य रेल्वेला सज्जड इशारा!
रत्नागिरी : मध्य व हार्बर रेल्वेच्या स्थानकांवर छटपूजेनिमित्त ११ नोव्हेंबर रोजी कर्णकर्कश आवाजात भोजपुरी गाणी वाजविण्याचे प्रकार झाले. याची दखल घेत आमच्या महिला कार्यकर्त्या श्रीमती. सीमा तांबोळी यांनी वडाळा स्थानकात लेखी तक्रार दाखल केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबर रोजी स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात जाऊन निवेदन देत तक्रार केली आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी गाणी वाजवायचे आदेश नेमके कोणी दिले, याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सदर आदेश केंद्रातून प्राप्त झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, हे आदेश नेमके कोणत्या विभागाकडून आणि कोणत्या अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार देण्यात आले, याबाबत लेखी आदेशाची प्रत दाखविण्याची विनंती केली असता, संबंधित अधिकाऱ्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजविण्याचे आदेश नेमके कोणी दिले, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित आदेश देणाऱ्या तसेच त्याची अंमलबजावणी करण्यास जबाबदार असलेल्या दोषींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने सांगितले की, भारत हे केवळ भौगोलिकदृष्ट्या एक राष्ट्र नसून विविध भाषिक राज्यांनी मिळून बनलेले संघराज्य आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीच्या आधारावर स्थापन झालेले, भाषिक राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हद्दीतील रेल्वे स्थानकांवर मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांशी निगडित सण-उत्सवांच्या अनुषंगाने, तसेच भारताचा प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिन यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि त्यानुषंगाने गाणी वाजविणे समजण्यासारखे आहे.
मात्र, छटपूजा हा महाराष्ट्राच्या पारंपरिक सांस्कृतिक परंपरेचा भाग नसताना, महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर ११ नोव्हेंबर रोजी छटपूजेनिमित्त कर्णकर्कश आवाजात भोजपुरी गाणी का वाजविण्यात आली, असा जाब मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री. प्रकाश कनोजिया तसेच मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. स्वप्निल नीला यांना विचारण्यात आला.यावेळी समितीचे पदाधिकारी श्री. आमरेश पाथरे, श्री. मिलिंद प्रधान, श्री. संजय धुरी, श्री. विजय औटी तसेच समितीचे सदस्य श्री. रामदास केरकर आणि श्री. राजासाहेब हे उपस्थित होते.
रेल्वे स्थानके ही सार्वजनिक ठिकाणे असून, तेथे सर्व प्रवाशांना शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात प्रवास करता यावा, ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. असे असताना, विशिष्ट सणाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यास परवानगी देऊन रेल्वे प्रशासनाने स्थानिक मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक भावनांचा विचार केलेला नाही. या प्रकारामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, समितीने या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सदर प्रकाराचा निषेध नोंदविला.
महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेचा आदर राखणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थानिक भाषा, संस्कृती आणि परंपरांना योग्य प्राधान्य देणे, ही संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या भूमीत स्थानिकांच्या सांस्कृतिक भावनांचा विचार न करता परराज्यातील भाषा आणि संस्कृतीचे प्रदर्शन करण्याच्या माध्यमातून त्यांच्यावर इतर राज्यांची संस्कृती लादण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा सज्जड इशारा देत संघर्ष समितीच्या वतीने खालील मागण्या करण्यात आल्या.
समितीच्या प्रमुख मागण्या :
१. छटपूजेनिमित्त महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर कर्णकर्कश आवाजात भोजपुरी गाणी वाजविण्याचे प्रकार तात्काळ बंद करण्यात यावेत.
२. यापुढे महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर कोणत्याही सण-उत्सवाच्या निमित्ताने ध्वनिप्रदूषण होईल अशा प्रकारे मोठ्या आवाजात गाणी वाजविण्यास परवानगी देऊ नये.
३. महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करताना स्थानिक मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरांचा आदर राखला जाईल, असे स्पष्ट धोरण निश्चित करावे.
४. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची रेल्वे प्रशासनाने दक्षता घ्यावी.
अन्यथा, महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेच्या रक्षणासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक अतिक्रमणाविरोधात आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, याची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने नोंद घ्यावी.



