कोकणमहाराष्ट्र

महिलांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या उभारणीत योगदान द्यावे : संजना मोहिते

  • डोंबिवली येथे युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळ्यात रत्नागिरीच्या नारीशक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा संजना मोहिते यांचा गौरव

रत्नागिरी : आजची महिला ही उद्याच्या समाजपरिवर्तनाची दिशा असून महिलांनी स्वतःच्या क्षमतांची जाणीव ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, नेतृत्व स्वीकारावे आणि देशाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे प्रेरणादायी आवाहन नारीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. संजना सचिन मोहिते यांनी केले.

कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित ‘युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळा – डोंबिवली २०२६’ या कार्यक्रमात सौ. संजना सचिन मोहिते यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र देऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सौ. संजना मोहिते यांनी दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी येथे नारीशक्ती फाउंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून त्या महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहेत. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्यविकास प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मविश्वासाने जीवन जगता यावे, यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.

महिला सक्षमीकरणाविषयी आपली भूमिका मांडताना सौ. मोहिते म्हणाल्या की, महिलांना केवळ संधी उपलब्ध करून देणे पुरेसे नाही, तर त्यांना निर्णयप्रक्रियेत स्थान, नेतृत्व करण्याचे स्वातंत्र्य आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी झाली, तर कुटुंब सक्षम होईल आणि सक्षम कुटुंबांतूनच सशक्त समाज व विकसित राष्ट्राची निर्मिती होईल.

महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, शिक्षण, उद्योग-व्यवसाय, सामाजिक कार्य आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत पुढाकार घ्यावा. स्वतःमधील कौशल्ये ओळखून आत्मविश्वासाने प्रगतीची वाटचाल करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नारीशक्ती फाउंडेशन करत असलेल्या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय व्यासपीठावर झालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पोचपावती ठरला आहे.

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सुनील गोडबोले, सौ. संजना मोहिते, सौ. सुविद्या दांडेकर, श्री. अजय अरुण दखवी, अभिनेत्री शृती पारकर, प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

महिलांना कौशल्य, रोजगार आणि आत्मनिर्भरतेची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या जीवनात आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण करण्याचे नारीशक्ती फाउंडेशनचे कार्य समाजपरिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button