कांदिवली रेल्वे स्थानकावरील मराठी भाषा वादात ठाम भूमिका घेणाऱ्या DCP सुनीता साळुंके-ठाकरे यांचा गौरव

वसई / मुंबई : कांदिवली रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीदरम्यान उद्भवलेल्या मराठी भाषा वादाच्या पार्श्वभूमीवर, परिस्थिती संयमाने आणि ठामपणे हाताळणाऱ्या पोलीस उपायुक्त (DCP) मा. सुनीता साळुंके-ठाकरे यांचा स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे विशेष गौरव करण्यात आला. वसई येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात श्री. आमरेश पाथरे यांच्या हस्ते त्यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
कांदिवली रेल्वे स्थानकावर नेमके काय घडले?
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी कांदिवली रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीदरम्यान वाद निर्माण झाला होता. मराठीत संवाद सुरू असताना संबंधितांकडून हिंदीत बोलण्याची सक्ती केली जात होती. यावरून स्थानक परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पश्चिम परीमंडळ (लोहमार्ग, मुंबई) च्या पोलीस उपायुक्त सुनीता साळुंके-ठाकरे यांनी त्वरित मध्यस्थी केली. त्यांनी मराठी भाषेचा सन्मान राखत आणि कायद्याच्या चौकटीत राहून संबंधितांना योग्य समज दिली अन् परिस्थिती वेळीच नियंत्रणात आणली.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची दखल घेऊन विशेष सन्मान
मराठी भाषेचा सन्मान, अस्मिता आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे रक्षण करणाऱ्या या भूमिकेची दखल घेत स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समितीने २२ ऑक्टोबर २०२६ रोजी वसई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी DCP सुनीता साळुंके-ठाकरे यांच्या कर्तव्यदक्षतेची प्रशंसा करत त्यांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले.



