Raigad : आरावी समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणाला गती देण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : रायगड (raigad) जिल्ह्यातील आरावी समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम मार्गी लावण्यासाठी आवश्यक परवानग्या व विभागीय अडचणी दूर करून कामाला गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आरावी समुद्रकिनाऱ्याच्या पर्यटनदृष्ट्या विकास होणे महत्वाचे असून, याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
भाऊचा धक्का ते दिवेआगार प्रस्तावित रो रो सेवेबाबत, बागमांडला जेट्टी येथील वाहनतळाच्या पार्किंगबाबत, मौजे कारविणे येथील श्रीकृष्ण जेट्टीची दुरूस्ती व जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाबाबत, दिवेआगार जेट्टीबाबत, आरावी समुद्रकिनारी सुशोभीकरण, मुळगांव बंधारा लगतच्या जमिनीच्या महाराष्ट्र सागरी मंडळाची मालकी करणेबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यटन व विकासाच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
आरावी समुद्रकिनारा गेल्या दीड-दोन वर्षांत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असून पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरणाची कामे होणे गरजेचे असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी बैठकीत नमूद केले. पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता अनधिकृत स्वरूपात स्टॉल किंवा झोपड्या उभारल्या जाण्याची शक्यता असून त्यापूर्वीच नियोजनबद्ध पद्धतीने समुद्रकिनाऱ्याचा विकास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरावी समुद्रकिनाऱ्यालगत कांदळवन, बफर झोन तसेच सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्राशी संबंधित बाबींची तपासणी करून संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशी चर्चा यावेळी झाली.
कासव संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या परिसरात पर्यटन विकास करताना पर्यावरणाचे संरक्षण कायम ठेवण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. विकासकामे करताना कासवांच्या अधिवासाला बाधा न आणता पर्यटन सुविधा विकसित करण्याबाबत संबंधित यंत्रणांनी समन्वयाने मार्ग काढावा, असे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, दिवेआगर समुद्रकिनाऱ्याच्या सुमारे ४ ते ४.५ किलोमीटरच्या पट्ट्याच्या विकासाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या परिसरात कासव संवर्धन सुरू असून त्याचबरोबर पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. समुद्रकिनाऱ्याच्या बंधाऱ्याच्या कामासोबत पुढील टप्प्यात सुशोभीकरण व पर्यटन सुविधा विकसित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
श्रीवर्धन, दिवेआगर, आरावी आणि हरिहरेश्वर या परिसरातील पर्यटनस्थळांना एकत्रितपणे पर्यटन सर्किटच्या माध्यमातून विकसित करण्याच्या दृष्टीने विविध प्रस्तावांवरही बैठकीत चर्चा झाली. हरिहरेश्वर येथील प्रदक्षिणा मार्गाच्या विकासाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून संबंधित कामांसाठी आवश्यक परवानग्या मिळविण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे.
आरावी समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक परवानग्या व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी आणि प्रलंबित अडचणी दूर करून काम पुढे न्यावे, असे मंत्री नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.



