दुष्काळी परिस्थितीवर तातडीच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करा : आमदार प्रमोद जठार

- देवरुख तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक; पाणी व भातशेती सर्वेक्षणाबाबत प्रशासनाला सूचना
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तहसीलदार कार्यालय, देवरुख येथे आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील पाणीटंचाई, शेतीचे नुकसान तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावनिहाय पाण्याचा आराखडा तयार करावा, आवश्यक ठिकाणी बोअरवेलची कामे तातडीने सुरू करावीत तसेच धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना आमदार जठार यांनी प्रशासनाला दिल्या. पाणीटंचाई निर्माण झालेल्या भागात आवश्यकतेनुसार टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.

भातशेतीच्या नुकसानीचा सर्वे लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करावा, तसेच प्रत्येक गावातील दुष्काळाशी संबंधित समस्या लेखी स्वरूपात नोंदवून त्याचा स्वतंत्र आराखडा तयार करावा, असेही आमदार जठार यांनी सांगितले.
बैठकीस तहसीलदार अमृता साळवी, गटविकास अधिकारी लोकरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, सुशांत मुळे, अभिजीत शेट्ये, वैभव यादव, श्रद्धा इंदुलकर, अमित ताठरे, दत्ताराम लिंगायत, मिथुन निकम, अविनाश गुरव, सतीश पटेल, महेश जाड्यार, तेजस शिंदे, मुकुंद जोशी, करंबेळे गुरुजी, समीर चाळके, राजू बोथरे, संतोष केदारी, दत्ता नार्वेकर, महेश राजवाडे, रूपाली कदम, सुधीर यशवंतराव यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
WaterConservation #KonkanDevelopment #devrukh #BJPMaharashtra



