कोकणदेश-विदेशमहाराष्ट्र

मुंबई लोकलमध्ये विद्यार्थी, गरोदर महिला व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र डब्यांची मागणी

  • मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून सकारात्मक दखल
  • हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडणार

मुंबई (शांताराम गुडेकर ) : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन शालेय विद्यार्थी, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबे सुरू करण्याची मागणी आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई संलग्न कुणबी महिला मंडळ आणि कुणबी युवा शिक्षण विभागाच्या शिष्टमंडळाने महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांची मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले.
प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित आयुक्तांना या विषयात जातीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले. तसेच, शालेय विद्यार्थी, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मुंबई लोकलमध्ये स्वतंत्र किंवा विशेष डबे सुरू करण्याबाबत केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे तातडीने शिफारस करण्यासह सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचे निर्देश दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. याशिवाय, येत्या हिवाळी अधिवेशनात हा विषय तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित करण्याच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


मुंबईची लोकल सेवा ही लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, प्रचंड गर्दी, गाडीत चढण्या-उतरण्याची धावपळ आणि लोकलमधून प्रवास करताना निर्माण होणारे धोके यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. विशेषतः शाळेत जाणारे विद्यार्थी, त्यांच्यासोबत प्रवास करणारे पालक, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागतो.

मुंबई लोकल अपघातांचे भीषण वास्तव: या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कुणबी महिला मंडळ आणि कुणबी युवा शिक्षण विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या (GRP) अधिकृत आकडेवारीचा दाखला देत अपघातांचे भीषण वास्तव खालीलप्रमाणे मंत्र्यांसमोर मांडले:
वार्षिक जीवघेणे अपघात: मुंबई लोकलच्या संपूर्ण जाळ्यावर प्रत्येक वर्षी सरासरी २,२०० ते २,५०० प्रवाशांचा अपघातात मृत्यू होतो, म्हणजेच दररोज ६ ते ७ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो.
अमानुष गर्दीचा फटका

एकूण अपघातांपैकी रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात सोडल्यास, दरवर्षी ५०० ते ६०० प्रवाशांचा मृत्यू हा केवळ सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयीन वेळेत (Peak Hours) चालत्या लोकलधून खाली पडून किंवा लोकल पकडण्याच्या गडबडीत होतो.
महिला व बालकांचे मोठे प्रमाण: मुंबई लोकलच्या एकूण प्रवाशांमध्ये महिलांचे प्रमाण २५% आहे. रेल्वे अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी २०० ते २५० महिला प्रवाशांचा मृत्यू होतो, ज्यातील ६०% पेक्षा जास्त अपघात हे गर्दीमुळे गाडीतून बाहेर फेकले गेल्याने किंवा लोकल पकडताना होतात.
विद्यार्थ्यांचे धोक्यात आलेले बालपण: शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा नोकरदारांच्या कार्यालयीन वेळेत येत असल्याने, पाठीवर जड दप्तर घेऊन प्रवास करणाऱ्या १०० ते १५० लहान मुलांचा व शालेय विद्यार्थ्यांचा दरवर्षी या गर्दीत बळी जातो. मुंबईत विद्यार्थ्यांच्या रेल्वे अपघाताचे प्रमाण ११% आहे, जे देशाच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे. शालेय विद्यार्थ्यांना पाठीवर जड दप्तर घेऊन गर्दीच्या लोकलमधून प्रवास करावा लागतो. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा अनेकदा कार्यालयीन वेळांशी जुळत असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही गर्दीतून सुरक्षितपणे प्रवास करणे आव्हानात्मक ठरते.या पार्श्वभूमीवर स्वतंत्र डब्यांची व्यवस्था केल्यास संबंधित प्रवाशांना अधिक सुरक्षितपणे प्रवास करता येईल आणि गर्दीचे योग्य विभाजन होण्यास मदत मिळेल. आजचे शालेय विद्यार्थी हे देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत, तर ज्येष्ठ नागरिकांनी देशाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. गरोदर महिलांच्या सुरक्षिततेचाही विचार होणे आवश्यक आहे. या सर्व घटकांचा प्रवास सुरक्षित करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. स्वतंत्र डब्यांची व्यवस्था झाल्यास गर्दीचे विभाजन होऊन अपघातांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका कुणबी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. दीपिका आग्रे आणि कुणबी युवा शिक्षण विभागाचे प्रमुख श्री. निलेश कुळये यांनी मांडली. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी आयोजित भेटीदरम्यान कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे खजिनदार श्री. महेश शिर्के, कुणबी महिला मंडळाच्या कायदेविषयक विभागप्रमुख ॲड. रूपाली खळे, कुणबी युवा मुंबई वैद्यकीय विभागप्रमुख श्री. निलेश कोकमकर, शाखा तालुका रत्नागिरीचे उपाध्यक्ष श्री. एकनाथ निंबरे, ॲड. संदीप आग्रे, युवा पदाधिकारी श्री. कैलास शिंदे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. मंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे या लढ्याला मोठे बळ मिळाले असून, आता लवकरच लोकल प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.

डिजीकोकण टीम

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटनविषयक अपडेट्स तसेच देश-विदेशातील ताज्या घडामोडींची माहिती क्षणार्धात हजारो वाचकांपर्यत पोहचविणारा डिजिटल प्लॅटफॉर्म.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button