Konkan Railway | वेरवली रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवावा !

- लांजा तालुक्यातील ३०-४० गावांच्या प्रवाशांची आ. प्रमोद जठार यांच्याकडे मागणी
लांजा (रत्नागिरी) : कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली रेल्वे स्थानकाचे क्रॉसिंग स्थानकाऐवजी नियमित रेल्वे स्थानकात रूपांतर करावे आणि प्रवाशांसाठी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी वेरवली रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेच्या वतीने आमदार प्रमोद जठार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या स्थानकाचा फायदा लांजा तालुक्यातील 30 ते 40 गावांतील नागरिकांना होतो. दररोज शेकडो चाकरमानी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक येथून प्रवास करतात. मात्र, सध्या या स्थानकावर प्लॅटफॉर्म नाही, पुरेसा निवारा शेड नाही आणि पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना तर रेल्वे रुळावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
प्रवासी संघटनेने आपल्या निवेदनात वेरवली येथे कायमस्वरूपी प्लॅटफॉर्मची उभारणी, अधिक एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांना थांबा देणे आणि निवारा शेड, पिण्याचे पाणी, दिवे यासारख्या पायाभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास लांजा आणि राजापूर तालुक्यातील हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
या निवेदनावर आमदार प्रमोद जठार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, “या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरच रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील,” असे आश्वासन दिले आहे.



