‘कोकण दर्शन’मध्ये सफर आडिवरे महाकाली, ऑर्गन निर्मिती आणि कनकादित्य मंदिराची!

- २६ सप्टेंबर रोजी होणार प्रसारण
रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून कोकणच्या कला, संस्कृती आणि समृद्ध धार्मिक परंपरेची ओळख करून देणाऱ्या अत्यंत लोकप्रिय ‘कोकण दर्शन’ या पर्यटनविषयक कार्यक्रमांतर्गत येत्या शुक्रवारी एका विशेष सफरीचे आयोजन करण्यात आले आहे. या भागात श्रोत्यांना आडीवरे येथील जागृत महाकाली मंदिर, कोकणातील पारंपरिक ऑर्गन निर्मितीचा दुर्मिळ उद्योग आणि कशेळी येथील ऐतिहासिक श्री देव कनकादित्य मंदिराची रंजक माहिती ऐकायला मिळणार आहे.
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ८:४० वाजता प्रक्षेपित होणाऱ्या या कार्यक्रमात महाकाली देवस्थानचे अध्यक्ष श्री. प्रसाद शेट्ये, ऑर्गन निर्माते श्री. उमाशंकर दाते, ज्येष्ठ कारागीर श्री. संजय तारळकर आणि श्री. आनंद ओळकर हे आपले अभ्यासपूर्ण अनुभव आणि माहिती श्रोत्यांसमोर उलगडणार आहेत..या दर्जेदार कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केले असून, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांचे आहे.
कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत. हा भाग श्रोत्यांना आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ११४३ Khz मध्यम लहरी (MW) आणि १०१.५ MHz एफ. एम. (FM) वर ऐकता येईल. याशिवाय, डिजिटल माध्यमांवर ‘NewsOnAir’ मोबाईल ॲप, अधिकृत युट्यूब चॅनेल ‘airratnagiri1248’ तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज ‘@airratnagiri’ या सोशल मीडिया हँडल्सवरही हा कार्यक्रम प्रसारणानंतर उपलब्ध असणार आहे.

तरी कोकणच्या या अनोख्या सांस्कृतिक, धार्मिक सफरीचा आनंद सर्व श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.



