छटपूजेसाठी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर व कृत्रिम तलाव निर्मितीस ‘स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती’चा विरोध

- मुंबई महानगर आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांना दिले निवेदन
मुंबई : छटपूजेच्या आयोजनासाठी मुंबई व उपनगरांमधील समुद्रकिनारे, नद्या, तलाव यांसारख्या नैसर्गिक जलस्रोतांचा वापर केल्यामुळे जलप्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. तसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करणेही अनावश्यक असल्याची भूमिका “स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती” ने घेतली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत सध्या पाणीटंचाई आणि दुष्काळाचे गंभीर संकट असताना परराज्यातील अशा कार्यक्रमांसाठी महाराष्ट्रातील उपलब्ध जलसंपत्तीचा अनावश्यक वापर करणे योग्य नाही.
नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे आणि पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखणे या व्यापक जनहिताच्या दृष्टीने मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने छटपूजेच्या आयोजनासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करण्यास तसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी “स्वायत्त महाराष्ट्र संघर्ष समिती” च्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तसेच अतिरिक्त आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी श्री. आमरेश पाथरे, श्री. मिलिंद प्रधान, श्री. संजय धुरी, श्री. विजय औटी तसेच समितीचे श्री. रामदास केरकर आणि श्री. राजा साहेब इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



