कलेच्या श्रीमंतीने जीवन समृद्ध करा : कवी प्रवीण दवणे

- रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमध्ये ‘लेखक आपल्या भेटीला’
रत्नागिरी (प्रतिनिधी): वाचन, चिंतन, मनन आणि संस्कारांतूनच माणूस घडतो. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे कलाक्षेत्र निवडून कला साधना करावी आणि कलेच्या श्रीमंतीने आपले जीवन समृद्ध करावे, असे आवाहन ज्येष्ठ कवी व गीतकार प्रवीण दवणे यांनी केले.
फाटक हायस्कूलमध्ये कोकण मराठी साहित्य परिषद आणि दि न्यू एज्युकेशन सोसायटी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ उपस्थित होते.
कलावंतांच्या सहवासातूनच नवे कलावंत घडतात. आपल्यातील कलागुण ओळखण्याचे हेच योग्य वय असून, अभ्यासाबरोबरच कला साधनेकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असे मत डॉ. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांशी साहित्यिकांचा थेट संवाद घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रवीण दवणे यांनी कविता सूचण्यामागील आनंददायी अनुभव साध्या-सोप्या शब्दांत उलगडला. ग. दि. माडगूळकर यांच्या ‘गीत रामायण’मधील साहित्यिक गोडवा अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांनी गीतरामायण ऐकावे, तसेच कोकणातील साहित्यिकांची पुस्तके आवर्जून वाचावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाला. मुख्याध्यापक राजन कीर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रज्ञा दामले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे आणि कोकण युवा मोर्चाचे प्रमुख अरुण मोरये यांचा संस्थेच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव राजीव गोगटे, मुख्याध्यापक राजन कीर, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये, आजी-माजी शिक्षकवृंद आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते. विजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले, तर विलास पांचाळ यांनी आभार मानले.



